दखल : जिवाभावाचे

प्रत्येकाच्याच आयुष्यात कुणी ना कुणी येतं, जे कधी संस्कार करून जातं तर कधी मनावर कायमचा ठसा उमटवून जातं. सांगायचं तात्पर्य हेच की, आपण जे आयुष्य जगतोय किंबहुना, ज्या पद्धतीनं जगतोय, त्यावर कळत नकळत का होईना इतरांचाही थोडासा ‘इम्पॅक्ट’ असतोच. लेखिका अरुणा सबाने यांनी ‘जिवाभावाचे’ या पुस्तकात असेच काही अनुभव वाचकांशी ‘शेअर’ केले आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असलेले हे अनुभव वर्तमानपत्रातून काही लेखमालांमधून प्रसिद्ध झाले आहेत, पण वर्तमानपत्रात लिहिताना त्यात काही उणिवा त्यांना जाणवल्यात आणि लेखमालेतील हे अनुभव पुस्तकरूपात प्रकाशित करताना त्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ता, लेखिका, संपादिका, प्रकाशिका, अशा अनेक रूपात जगताना नानाविध व्यक्तिमत्त्वांशी त्यांचा परिचय आला. या व्यक्तिमत्त्वांमध्ये इंदिरा गांधींपासून, तर दुर्गाबाई भागवत, कुसुमाग्रज, आशा भोसले, अशा कितीतरी व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. विनोबाजींच्या पवनारमधील आश्रमात लहानपणी त्यांनी वास्तव्य केलंय, मात्र याच आश्रमासमोरील रस्त्यावरून त्यांचं जाणं येणं होतं असलं तरीही आता त्यांना एकदाही तिथं जावंसं वाटत नाही. हे असं का बरं घडत असावं, असा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहतो. लेखिकेनं हे स्पष्टपणे मान्य केलंय की, आता तिथं जायची इच्छा होत नाही, पण त्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीय. त्यामुळे प्रस्तावनेतील हे अधुरेपण कुठंतरी खटकतं.
या पुस्तकातील लेखमालेची सुरुवात त्यांनी त्यांच्या आईपासून केली आहे. आईनं केलेल्या संस्काराचं मोल होऊ शकत नाही. ज्याकाळात एका सामान्य कुटुंबातील स्त्रीला तोंडातून एक साधा शब्द काढायची परवानगी नव्हती, त्या काळात लेखिकेच्या आईनं समाजाचं जिथं चुकतं तिथं उत्तर द्यायला मागंपुढं पाहिलं नाही. या आईनंच त्यांना एवढं कणखर बनवलंय, हे या पुस्तकातील पहिल्याच लेखावरून कळतं.
इंदिरा गांधींना त्यांनी लहानपणीच पाहिलंय आणि ऐकलंयसुद्धा, पण त्या बालवयात इंदिराजींचा ऐकलेला शब्द न शब्द त्यांना आजही रोमांचित करतो आहे. कधीकधी काही व्यक्तींना आपण प्रत्यक्षात भेटत नाही तरीसुद्धा गाण्यातून, लेखातून त्यांचं अप्रत्यक्ष भेटणं आपल्यावर अमिट छाप सोडून जातं. आशा भोसलेंच्या ‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख..’ या गाण्यानं आयुष्यातल्या अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचं बळ दिल्याचं लेखिका सहजपणे सांगून जातात. माणसावर संस्कार करणारं सर्वात प्रभावी साधन म्हणजे पुस्तक. पुस्तकानं माणूस घडतो, असं म्हणतात ते काही खोटं नाही. अरुणा सबाने यांनी ‘जिवाभावाचे’ या पुस्तकातून ते मांडलेलं आहे.
अनेक साहित्यिकांशी, कवी, लेखकांशी अरुणा सबाने यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलाय आणि त्यातून त्या लेखिका, प्रकाशिका, संपादिका म्हणून घडत गेल्या. तरीही, काही छोटय़ा छोटय़ा उणिवा या पुस्तकात जाणवतात. त्यांच्या आईवरील पहिल्याच लेखात ‘सगळ्यांच्या आंघोळी, नाश्ता, चहा सारी तयारी करून ७ वाजता रेडी असायचो’ असं एका वाक्य आहे. या वाक्यातला ‘रेडी’ हा इंग्रजी शब्द खटकतो. त्याऐवजी ‘तयार’ हा शब्द वापरला असता तर ते वाक्य पूर्ण वाटलं असतं. मराठीत इंग्रजीची घुसखोरी अलीकडं व्हायला लागली, पण ती प्रत्येकच ठिकाणी योग्य वाटत नाही. या छोटय़ा छोटय़ा उणिवा सोडल्या तर पुस्तकातील प्रत्येकच लेख मात्र वाचकांच्या पसंतीला उतरेल, असाच आहे, कारण त्यात लेखिकेनं त्यांच्या आयुष्यात आलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा त्यांच्यावर झालेला परिणाम अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे कल्पित कथा आणि प्रत्यक्षातील अनुभव, या दोहोंपैकी प्रत्यक्षातील अनुभव अधिक वाचनीय असतात, हे वाचकांना सांगायची गरज नाही. त्यादृष्टीनं हे पुस्तक खरोखरीच वाचनीय आहे.
आकांक्षा प्रकाशन, कोतवालनगर, नागपूर,
दूरध्वनी क्र. २२४७८८४
भ्रमणध्वनी क्र. ९९७००९५५६२
Leave a Reply