‘आकांक्षा’ मासिकाच्या शंभराव्या अंकाचे प्रकाशन

‘आकांक्षा’ हे मासिक राहिले नसून चळवळ झाली असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमाताई साखरे यांनी काढले. अरुणा सबाने संपादित ‘आकांक्षा’ या मासिकाचा तेरावा वर्धापनदिन आणि मासिकाच्या शंभराव्या अंकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी शंकरनगर चौकातील धनवटे सभागृहात पार पडला. त्यावेळी सीमाताई प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. शेतकरी चळवळीचे नेते चंद्रकांत वानखडे आणि पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे वृत्तसंपादक सचिन काटे यावेळी उपस्थित होते.
सीमाताई म्हणाल्या, कोणतेही मासिक एखाद्या महिलेने प्रकाशित करणे हे काम सोपे नाही. त्यासाठी जिद्द, व्यवहार कौशल्य व स्त्रियांचे प्रश्न हाताळण्याची हातोटी असणे आवश्यक असते. हे गुण अरुणा सबाने यांच्या ठायी आहेत. त्यामुळे आकांक्षा हे मासिक राहिले नसून चळवळ झाली आहे. हे मासिक किती महिला वाचतात त्यापेक्षा त्यात प्रबोधनात्मक काय आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आतापर्यंत निघालेले आकांक्षाचे सर्व अंक वाचनीय आहेत. यापुढील अंकही वाचनीय, प्रबोधनात्मक व स्त्रियांच्या समस्या हाताळणारे राहतील, अशी अपेक्षा सीमाताईंनी व्यक्त केली.
गिरीश गांधी म्हणाले, विदर्भात महिलांच्या विविध समस्यांना घेऊन चळवळी चालवल्या जात आहेत. परंतु त्या प्रवाहित नाहीत. महिलांच्या चळवळींना प्रोत्साहन दिले तरच या क्षेत्रातील महिलांत कर्तृत्व दाखवण्याची उर्मी निर्माण होईल. अरुणा सबाने यांच्या मासिकात सातत्य आहे. कोणत्याही व्यवसायात योग्य नियोजनावर यश अवलंबून असते. त्यानुसार सबाने यांच्या व्यवहार कौशल्य, योग्य संवाद आणि विषयाच्या विविधतेचे गिरीश गांधी यांनी कौतुक केले.
चंद्रकांत वानखडे म्हणाले, आम्ही शेतकरी चळवळीचे मासिक काढले परंतु ते लवकरच बंद पडले. त्यामुळे मासिक काढणे हे कठीण काम असल्याची खात्री झाली. अशाही परिस्थितीत सबाने संकटांना तोंड देत उत्तमरित्या मासिक काढत आहेत, या शब्दात वानखडे यांनी शाबासकीची थाप दिली. त्यांच्याच हस्ते ‘आकांक्षा’च्या शंभराव्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. सचिन काटे यांचेही यावेळी भाषण झाले. अरुणा सबाने यांनी ‘आकांक्षा’ मासिकाच्या वाटचालीचा प्रास्ताविकात थोडक्यात आढावा घेतला. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे मासिक चालवेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. संचालन विजय रेवतकर यांनी केले. अरुणा सबाने यांनी आभार मानले.
Leave a Reply