‘आकांक्षा’ मासिकाची ई-बुकपर्यंत भरारी

महाराष्ट्रातील मोजक्याच महिला प्रकाशकांमध्ये नावलौकिक मिळवलेल्या अरुणा सबाने यांच्या ‘आकांक्षा’ मासिकाने ई-बुकपर्यंत भरारी घेतली आहे. अरुणा सबाने यांचे आकांक्षा प्रकाशन आता डिजिटल झाले आहे.

नव्याने आलेल्या पुस्तकांची खरेदी करण्याची अनेकांना आवड असते, पण नवे डिजिटल तंत्रज्ञान, युवकांचा इंटरनेटकडे वाढता कल आणि प्रकाशन व्यवसायात निर्माण झालेली स्पर्धा यामुळे बरेच प्रकाशन डिजिटल झाले आहेत. त्याच स्पर्धेत अवघे आठ वर्षांचे वय असलेल्या आकांक्षानेही स्वत:चे स्थान पटकावले आहे. पाच वर्षांपूर्वी २००७ ला पहिल्यांदा ई-दिवाळी अंक काढण्याचा विचार आला. मुलाखती, चर्चा, कविता, असा सर्व मजकूर तयार करून आवश्यक ते चित्रीकरण करण्यात आले. सर्व साहित्याची डिजिटल कॉपी बनवून सीडीत सेव्ह करताना मात्र, अनेक तांत्रिक अडचणींना अरुणा सबाने यांना तोंड द्यावे लागले. त्यावेळी नागपुरात हव्या त्या सुविधा नव्हत्या. तेव्हापासून ई-बुकचा डोक्यात घोळणारा विचार पाच वर्षांनंतर फलद्रुप झाल्याचे सबाने सांगतात. दरम्यानच्या काळात इंटरनेटवरील बुक गंगा संकेतस्थळाची माहिती मिळाली. त्यांच्याकडे नोंदणी केली व ११८ पुस्तकांपैकी ६५ पुस्तके ‘ई-बुक’वर वाचकांसाठी उपलब्ध करून दिली. बुक गंगा संकेतस्थळाला निवडल्यानंतर पब्लिकेशनच्या पर्यायाला क्लिक केल्यानंतर प्रकाशकांची एक मोठी यादी वाचकांसमोर खुली होते. यादीतील आकांक्षा प्रकाशनला क्लिक केल्यास पुस्तकांची यादी, त्यांचे लेखक, किंमत आणि मुखपृष्ठ इत्यादी अशी सर्व माहिती उपलब्ध होते.

डॉ. द.भि. कुलकर्णी यांचे ‘जीएंची महाकथा’, ‘सुरेश भट नवे आकलन’, ‘प्रतितीभेद’, ‘समीक्षेची सरहद्द’, डॉ.यशवंत मनोहर यांचे ‘साहित्य संस्कृतीच्या प्रकाशवाटा’, डॉ. प्रकाश खरात यांचे ‘आंबेडकरवाद आणि संस्कृती’, अरुणा सबाने यांची ‘मुन्नी’, ‘विमुक्ता’, ‘जखम मनावरची’, ‘जिवाभावाचे’, ‘प्रतिभावंत’, ‘स्त्रीवाद एक दृष्टिक्षेप’, पार्थ पोळके यांचे ‘बुध्द धम्म ते धर्मातर’, जी.के.ऐनापुरे यांचे ‘स्कॉलरज्युस’, तारा भवाळकर यांचे ‘निरगाठ सुरगाठ’, ‘लोकांगण’, ज्ञानेश्वर रक्षक यांचे ‘जनक्रांतीच्या पाऊलवाटा’, श्रीधर शनवारे यांचे ‘सरवा’, ‘तीन ओळींची कविता’, आनंद पाटील यांचे ‘तरवा’, ‘टीकीवस्त्रहरण’, ललित सोनोने यांचे ‘एक वलय दु:खाचे’, बा.ह.कल्याणकर यांचे ‘धृतराष्ट्र’ आणि यशवंत चव्हाण व म.म.देशपांडे यांचे ‘जगाचे श्वास’ अशी अनेक वाचनीय पुस्तके बघायला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + four =